रोडरोमिओंचा कदमवाकवस्तीत धुडगूस; महिलांसह नागरिक वैतागले
पुणे : पुणे शहराच्या जवळ अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या पूर्व हवेली परिसरात मोठमोठी महाविद्यालये, विद्यालये व खासगी क्लासेस सुरू झाले आहेत. त्याचबरोबर पाठीवर सॅक अडकवून बाईकवरून ट्रिपल सीट कर्णकर्कश हॉर्न व बुलेटचे बार वाजवत फिरणाऱ्या रोडरोमिओंचा वावरसुद्धा महाविद्यालये, विद्यालये अन् क्लासेस परिसरात फोफावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त बनले आहेत.
पूर्व हवेलीत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या परिसरात बऱ्याच शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस आहेत. सध्या दहावीची परीक्षा सुद्धा सुरू आहे. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंचा त्रास परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पेपर सुटल्यावर महाविद्यालयाच्या आवारात दुचाकीवरून फिरणाऱ्या टवाळखोरांच्या कर्णकर्कश हॉर्नचा वृद्ध तसेच शिक्षक वर्गाला देखील नाहक त्रास होत आहे.
या टवाळखोरांच्या भीतीमुळे तक्रारीसाठी कोणी समोर येत नाही. परिसरात अल्पवयीन मुलांना मोटारसायकल दामटवण्याचे वेड
लागले आहे. शाळा-महाविद्यालयांमधून धूम स्टाईलने “जॉय रायडिंग” वाढत आहे. शिकाऊ परवाना असलेली किंवा हा परवाना नसलेली मुलेही यामध्ये मागे राहिलेली नाहीत. मात्र, मुलांच्या या बाईक रायडिंगकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले असून पालकही याला खत- पाणी घालताना दिसत आहेत. यामधून पूर्व हवेली परिसरात गंभीर तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघात देखील घडले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!