पुणे हादरले ! मुलींच्या शाळेत शिरुन ११ वर्षीय मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार
पुणे :ओळख असल्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणी संबंधित नराधमावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!