कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवातकृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश पारीत करून राज्यातील निवडणूकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका प्रथमत: तातडीने मुदतीत पूर्ण कराव्यात व त्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 652, 1 हजार 611 व 15 हजार 320 अशा एकूण 17 हजार 583 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या असून त्यापैकी अनुक्रमे 652, 972 व 11 हजार 747 अशा एकूण 13 हजार 371 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

प्रारूप मतदार याद्या प्राप्त झालेल्या आहेत अशा उर्वरित कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच प्रारूप मतदार याद्या प्राप्त न झालेल्या संस्थांवर प्रशासकीय कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका पूर्ण करण्यात येणार आहेत.

या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी कळविले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.