किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या आण पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली असून विशेष न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे दोघांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.
आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’ मोहिमेच्या माध्यमातून जमा केलेले पैसे भाजपकडे जमा केल्याचा युक्तीवाद न्यायालयात झाला होता.
या प्रकरणात आरोपींनी कोर्टात सांगितले की, ‘सेव्ह विक्रांत’ मोहीमेचा सर्व निधी आम्ही पक्षाच्या हवाली केला. परंतु, हे पैसे राजभवनाला मिळालेलेच नाहीत. त्यामुळे पोलीस कोठीडीतील चौकशीदरम्यान किरीट सोमय्या यांनी हा सगळा निधी पक्षातील नेमक्या कोणत्या नेत्याकडे दिला, हे स्पष्ट करावे, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले माहितीत म्हटलं.
दरम्यान सेव्ह विक्रांत मोहिमेतून किरीट सोमय्या यांनी 140 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी विक्रांतच्या डागडुजीसाठी ५७ कोटीचा निधी गोळा केल्याचं युक्तीवादात म्हटलं आहे.
दरम्यान जाणीवपूर्वक केलेला गुन्हा हा हत्येपेक्षाही मोठा असतो. या लोक वर्गणीचे काय झाले ? यापैकी एकही पैसा राज्यपालांकडे आला नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. परिणामी किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य ठरणार नाही, असे प्रदीप घरत यांनी म्हटले.
जानेवारी २०१३ मध्ये घडलेल्या घटनेची इतक्या वर्षांनी दखल घेतली गेली. आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी सर्वपक्षीयांनी निधी जमवला. यात शिवसेनेचा देखील समावेश होता. मात्र आता शिवसेना आणि भाजपचे संबंध खराब झाल्याने किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सोमय्यांच्या वकिलांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!