पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या २ दिवसात पतीची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी चिंचवड: प्रेम विवाहानंतर पाचच महिन्यात तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १०) चिंचवड येथे घडली. त्यानंतर विरह सहन न झाल्याने २ दिवसांनी तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवारी (दि. १३) गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही, मला माफ करा, असे लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली.
अक्षय अंबिलवादे (वय २५, रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगताप/ अंबिलवादे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक, गणेशनगर येथे वास्तव्यास असलेल्या अक्षय आणि अश्विनी यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत झाले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर ते चिंचवड येथे राहू लागले. दरम्यान, अश्विनीने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या अश्विनीने अचानक साथ सोडल्याने अक्षय खचला होता.
अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर तो आई वडिलांसोबत डांगे चौक येथे आला होता. त्याच्या मित्र परिवाराला अक्षय काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल, याची कल्पना होती. त्यामुळे मित्र त्याच्याजवळच बसून होते. दरम्यान, बुधवारी सकाळी मित्र अंघोळीसाठी आपापल्या घरी गेल्यानंतर अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अक्षयने लिहिलेली चिट्ठी
माझ्या पत्नीशिवाय राहू शकत नाही, माझे जे काय आहे ते माझ्या सवंगड्यांना माहीत आहे. मित्रांनो मला तुम्ही पण माफ करा, कारण मी तुमचापण गुन्हेगार आहे. काका- काकू, मला माफ करा. पप्पा, भाऊंना अलग पडू देऊ नका, पोलिसांनी सहकार्य करावे, असे अक्षय याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!