बावधनमधील त्या खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून नाल्यात फेकले होते प्रेत!
पिंपरी चिंचवड : अज्ञात व्यक्तीचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह सिमेंटच्या पोत्यात भरून हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना रविवारी (दि.17) सायंकाळी 6.15 वा उघडकीस आली. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे आणि मारेकऱ्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने एक दुचाकीच्या हालचालीवरून हिंजवडी पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शोधून दोन आरोपींनाअटक केली आहे. बिगारी काम करणा-या या इसमाचा त्याच्या साथीदारांसोबत झालेल्या किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
राजु दिनानाथ महातो (वय 36, रा. बावधन, पुणे, मुळगाव – खलदार, कोलकत्ता) असे खून झालेल्या या इसमाचे नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी या खून प्रकरणात सुनील मुना चौहान (वय 26, रा. बावधन, मुळगाव बिहार), मुन्ना फुनी चौहान (वय 40), योगेंद्र श्रीगुल्ले राम (वय 40, मुळगाव उत्तर प्रदेश) आणि बलिंदर श्रीगुल्ले राम (वय 36) यांना मंगळवारी (दि.19) अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो हे आरोपी यांच्या सोबत बिगारी काम करायचे, महातो यांचा आरोपी सुनील मुना चौहान याच्याशी वाद झाला. त्यातून सुनील याने गळा आवळून महातो याचा खून.केला. इतर आरोपींनी मृतदेह दोरीने बांधून गोणीत.भरला व बावधन येथील पुणे – मुंबई हायवे लगत असलेल्या नाल्यात फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
हिंजवडी पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या चारी दिशांना असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. तसेच, आजुबाजुला असलेले 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये दोन इसम दुचाकीवरून पांढ-या पोत्यात काहीतरी घेऊन जाताना दिसले.याबाबत माहिती घेतली असता ही दुचाकी बावधन येथील एका इसमाची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याठिकाणी जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!