कौटुंबिक वादातून जावायाने केला सासऱ्याचा खून, आरोपी चाकू घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात
पुणे : कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना बुधवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार परिसरात बस थांब्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानात घडली. या घटनेनंतर आरोपी स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली दिली.
रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65, रा. आकाशदीप सोसायटी, खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कुडले रमेश उत्तरकर यांचा जावई आहे. 2019 पासून अशोक आणि त्याच्या पत्नीत वाद होते. त्यामुळे ते दोघे वेगळे राहायचा अस. त्याची पत्नीही गेल्या तीन वर्षापासून वडिलांकडे राहायला आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
दरम्यान या दोन कुटुंबातील वाद हा न्यायप्रविष्ट आहे. अशोक कुडले हा आपल्या पत्नीला नांदायला परत पाठवा अशी मागणी सतत आपल्या सासर्याकडे करत होता. तर उत्तरकर हे घटस्पोट देण्याबाबत ठाम होते. याप्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. या दरम्यानच या दोघांमध्ये काल दुपारी वाद झाला. हाच वादाचा राग डोक्यात ठेवून संध्याकाळी अशोक हा उत्तरकर यांच्या दुकानात गेला. उत्तरकर हे सायंकाळी दुकानात बसले असताना अशोकने त्यांच्यावर चाकूने जोरदार वार केले. त्यानंतर उत्तरकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर अशोक कुडले स्वतः हातात चाकू घेत खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि खून केल्याची कबुली देखील दिली. आरोपी कुडकेच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी उत्तरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उत्तरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!