BIG BREAKING: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंवर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?
औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कलमं – 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 (अटी शर्तींचा भंग करणे)
153 – दोन समूहात भांडण लावणे
116 – गुन्हा करण्यासाठी मदत
117 – गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण
रस्त्यावर उतरुन नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नका : शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!