कोलकाता विरुद्ध लखनऊ सामन्या दरम्यान चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्याला अटक
पिंपरी चिंचवड : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस या आयपीएल क्रिकेट सामन्याची तिकिटे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शनिवारी (दि. 7) रात्री हा सामना झाला. त्यावेळी दोघे जण तिकीट ब्लॅकने विकतानाचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
बाबासाहेब रामदास आमले (वय 26, रा. कुसगाव, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्यासह शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रेयस हनुमंत येलवार (वय 21, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या MCA क्रिकेट मैदानावर कोलकाता नाईट रायडर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना नुकताच खेळला गेला. स्टेडियमच्या आत गेट नंबर तीन येथे दोन तरुण आयपीएल क्रिकेट मॅचच्या तिकिटाचे चढ्या दराने विक्री करत होते.
तक्रारदार यांनी तिकीट घेतलं, पण त्यांना मुख्य किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले. या प्रकरणी तळेगाव पोलिसात श्रेयस यांनी तक्रार दिली असून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, बाबासाहेब रामदास आमले याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!