Bumble Dating App वर झाली ओळख, मालदीवला नेण्याच्या आमिषाने महिला बँक मॅनेजरचा केला विनयभंग
पिंपरी चिंचवड : बंबल या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या व्यक्तीने एका तरुणीला मालदीवला फिरायला जाण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच आरोपीने मालदीवला जाण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीकडून 50 हजार रुपये उकळले.हा प्रकार 11 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 या कालावधीत पिंपरी चिंचवडमधील रहाटणी येथे घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मॅडी सुर्या या नावाने युजर असलेल्या मुकेश सूर्यवंशी (रा. कल्पतरु सोसायटी, कल्याणीनगर) याच्यावर IPC 354, 406,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 28 वर्षाच्या तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.8) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पिंपरी चिंचवड येथील एका बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम करत असून ती परराज्यातील आहे. त्यांची आणि आरोपीची बंबल या डेटिंग अॅपवर 11 मार्च रोजी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडीतेला फोन आणि मेसेज द्वारे संपर्क साधला. आरोपी मुकेश सुर्यवंशी याने 13 व 14 मार्च रोजी तरुणीच्या घरी येऊन तिचा विश्वास संपादन करुन मालदिव ट्रिपची ऑफर दिली. तसेच ट्रिपसाठी 95 हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगून ट्रिपमध्ये 1 लाख रुपये खर्च करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. तसेच ट्रिपसाठी होणाऱ्या 95 हजार रुपयापैकी 50 हजार रुपये तरुणीला देण्यास सांगितले. त्यानुसार तिने आरोपीला 50 हजार आणि पासपोर्ट झेरॉक्स दिली.
दरम्यान, आरोपीने पीडित तरुणीसोबत बोलत असताना तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यानंतर आरोपीने वारंवार संपर्क साधला. तसेच मालदीव ट्रिपची तारीख उलटून गेल्याने आरोपीने फसवणूक केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणी परराज्यातील असल्याने ती घाबरली होती. अखेर तिने रविवारी (दि.8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ यांनी सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!