किडनी तस्करी प्रकरण : रुबी हॉल हॉस्पिटलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह १५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपणाचा परवानाही निलंबीत केला होता.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाखांचे आमिष दाखून रुबी हॉलमध्ये त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण केले. यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. त्यांनतर ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला १५ लाख रुपये देण्याचे आमिष साळुंखे यांनी दाखविले. मात्र, ते न मिळाल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हा किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला होता
याप्रकरणात आता रुबी हॉल रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कायदेशीर सल्लागार यांच्यावर फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. किडनी प्रत्यारोपनाचा गैरप्रकार हा रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडल्यामुळे मॅनेजिंग ट्रस्टी हे तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!