दरोड्याच्या तयारीतील टोळीला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद
- क्राईम
- September 1, 2022
- No Comment
पुणे: दरोड्याच्या तयारीतील टोळीला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरारी आहे. अन्य दोघा अल्पवयीन मुलांचाही टोळीत समावेश आहे.
चोरीच्या गाडीतून ही टोळी दुकान फोडण्यासाठी आली होती. मात्र त्या अगोदरच पोलिसांना सुगावा लागला. गणेश दगडू शिंदे (वय 30,रा. काळेवाडी पिंपरी), यश सर्जेराव खवळे (वय19, रा. भारतनगर पिंपरी) अशी दोघांची नावे आहेत, तर साहिल मोरे (वय 25, रा. कासारवाडी) हा फरार झाला आहे.
त्यांच्याकडून बॅटरी, मिरचीपूड, नायलॉन दोरी, लोखंडी कटर, रोकड व चोरीची गाडी असा 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना रात्रगस्तीवर असताना एक चारचाकी गाडी संशयास्पदरीत्या संघर्ष चौक चंदननगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. गाडीत चार ते पाच व्यक्ती असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत, असेही समजले होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव, रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोहर सोनवणे यांच्या पथकाने गाडीसह संशयास्पद आरोपींना ताब्यात घेतले.