दोन वर्षांनंतर पुण्यनगरी शहरभर मंगलमय
- पुणे
- September 2, 2022
- No Comment
पुणे: दोन वर्षांनंतर पुण्यनगरी शहरभर मंगलमय वातावरणात गणेशाची मिरवणूक आणि प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती
ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाची पंरपरेप्रमाणे मिरवणूक काढून गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीतून सोमवार पेठेतील मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओतून घेऊन उत्सवाला सुरुवात झाली. तेथून मिरवणुकीने मूर्ती उत्सव मांडवात आणण्यात आली. सनई चौघडा, प्रभात बॅंड पथक तसेच संघर्ष, वाद्यवृंद आणि श्रीराम या तीन ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. यंदाचे हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने ते औचित्य साधून हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि धैर्यशील राजगुरू यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी
ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीचे चांदीच्या पालखीतून उत्सव मंडपात आगमन झाले. कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याआधी बाप्पांची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नगारावादन, न्यू गंधर्व बॅंडपथक, शिवमुद्रा आणि ताल ढोल-ताशा पथक आणि विष्णूनाद शंख पथकाचा समावेश होता. याशिवाय यंदाचे वैशिष्ट्य ठरले ते गोंधळी पथकाचे. यामध्ये गोंधळींच्या पथकातील संबळवादक आणि ताशावादक यांची अनोखी जुगलबंदी मिरवणुकीत गणेशभक्तांना अनुभवता आली.
मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम मंडळ
श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी करण्यात आली. सुभाष सरपाले आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या आकर्षक पुष्पसजावटीच्या रथातून गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविकही मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगारावादन, अतुल बेहरे यांचे नादब्रह्म महिलांचे ढोल-ताशा पथक, गर्जना, गुरुजी प्रतिष्ठान आणि येरवडा येथील श्री ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. या पथकांनी केलेल्या दणदणाटाने परिसर दुमदुमून जात होता. याच दणदणाटात उद्घोष होत होता तो गणपती बाप्पा मोरयाचा!
मानाचा चौथा गणपती – तुळशीबाग मंडळ
स्वानंदलोक महालाची प्रतिकृती असलेल्या सरपाले बंधू यांनी साकारलेल्या पुष्परथातून श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक 11 वाजून 35 मिनिटांनी गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्याने निघाली. शिवगर्जना, समर्थ आणि उगम या तीन ढोल-ताशा पथकांच्या कलाविष्काराने गणेशभक्तांना खिळवून ठेवले. गणपती चौकातून कार्यकर्त्यांनी मूर्ती उचलून 2 वाजून 47 मिनिटांनी उत्सव मंडपामध्ये आणली.
मानाचा पाचवा गणपती – केसरीवाडा
“केसरी’चे विश्वस्त- सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक आणि विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यांच्या हस्ते दुपारी 11.30 वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने आदी उपस्थित होते. प्रतिष्ठापनेपूर्वी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बिडवे बंधू यांचे नगरावादन, श्रीराम पथक आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती. रमणबाग चौकातून सकाळी 10.30 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष भक्तांनी केला.