धक्कादायकः ब्लेडने वार करून ज्येष्ठ महिलेचा खून,सोन्याचे दागिने आणि रोख केली लंपास
- क्राईम
- September 15, 2022
- No Comment
वारजे: पुण्यातील वारजे परिसरात ब्लेडने वार करून एका ज्येष्ठ महिलेचा खून करण्यात आला.अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुलक्षणा सुभाष डांगे (वय 65, रा. सुगम विश्व कॉलनी, आकाश नगर वारजे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुलक्षणा डांगे यांचा जावई आणि नात कामासाठी गेले होते.त्यानंतर त्या एकट्याच घरात होत्या. विश्व इमारतीतील पहिल्या मजल्यावर त्या राहत होत्या. दुपारच्या सुमारास पाणी भरण्यासाठी त्या खाली आल्याचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यानंतर मात्र त्या कुणालाच दिसल्या नाहीत.
सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या घराचे दार ढकलले असता त्या रक्ताच्या थरोळात पडल्या होत्या.त्यानंतर वारजे पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन तपास केला असता, त्यांच्या अंगावरील सोन्याची दागिने आणि घरातील काही पैसे चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे चोरीला प्रतिकार केल्याने त्यांचा खून केला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.