आंतरराष्ट्रीय

Facebook चे नाव बदलले, मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा; लोगोतही बदल


नवी दिल्ली :सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने (Facebook) आपले नाव बदलले आहे.. फेसबुकचा संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने याविषयी माहिती दिली. कंपनीच्या वार्षिक सभेत याविषयीची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात बोलत असताना,  झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकचे नवे नाव ‘META’ असे  असेल अशी माहिती दिली. अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची चर्चा सुरु आहे. अखेर नाव बदलण्याची प्रक्रिया संपली आहे. फेसबुकला ‘META’ (मेटा) असे नाव दिले आहे.

मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे केलेले आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असे म्हटले जाते. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही ‘मेटा’ या नावाने ओळखले जाणार आहोत, असे मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

नवीन नावाचा अर्थ काय आहे?

फेसबुकचे नवे नाव फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी सुचवले आहे. आता मार्क झुकेरबर्ग अगोदरच व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने, त्यांच्या कंपनीचे नाव बदलून मेटा करणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. आता या नव्या नावाद्वारे झुकेरबर्ग जगासमोर फक्त एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपुरते मर्यादीत राहणार नाही

 

नाव का बदलावे लागले?

फेसबुकवर (Facebook) ज्यावेळी आरोप होत होते त्याचवेळी कंपनीचे नाव बदलण्याचे ठरले होते. अस म्हटलं जात आहे की, फेसबुक आपल्या युजरचा डाटा सुरक्षित ठेवत नाही. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने काही गुप्त कागदपत्रे लीक केली होती, तेव्हाच फेसबुकने स्वतःच्या नफ्याला वापरकर्त्यांच्या सुरक्षेपेक्षा जास्त स्थान दिले असल्याचे समोर आले होते. मार्क झुकेरबर्गने हे आरोप फेटाळून लावले होते. पण फेसबुकला याचा मोठा फटका बसला होता.

आता फेसबुकने आपले नाव बदलले आहे. मार्क झुकरबर्गने वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेतली असल्याचे म्हटले आहे. आपल्या भाषणात, मार्क झुकेरबर्गने म्हटले की, अशा सुरक्षा नियंत्रणांची येत्या काळात आवश्यकता असेल. जेणेकरुन मेटाव्हर्सच्या जगात कोणत्याही मानवाला इतरांच्या जागेत जाण्याची परवानगी मिळणार नाही.

लसीच्या कच्च्या मालासाठी अदर पुनावालांची थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विनंती


पुणे : देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच विनंती केली आहे.

अमेरिका आणि युरोपमधून करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.

शुक्रवारी अदार पूनावाला यांनी ट्वीट केले की, “ आदरणीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जर आपण खरोखरच विषाणूचा पराभव करण्यासाठी एकजूट असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेबाहेरील लस उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा. जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल. आपल्या प्रशासनाकडे सविस्तर माहिती आहे.” अद्याप यावर अमेरिकेकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.

 

“शक्य असतं, तर मीच अमेरिकेत आंदोलन केलं असतं”
अदर पुनावाला यांनी याआधीही कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं होतं. यावेळी त्यांनी शक्य असतं तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं असं म्हटलं होतं. “मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील करोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं होतं.

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. सहा महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं होतं.

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.

 

सावधान ! आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला; बॉक्स बाजारात पोहोचल्याने खळबळ


नवी दिल्ली : चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जग कोरोनापासून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमधल्या तियानजिन शहरात आईस्क्रीममध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे.

चीनच्या पूर्वेकडील तियानजिन भागात आईस्क्रीम विकले जात होते. येथील स्थानिक कंपनी या आईस्क्रीमची निर्मिती करत होती. तपासणीसाठी आईस्क्रीमचे काही नमुने घेण्यात आले होते. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गोष्ट लक्षात येताच तेथील स्थानिक प्रशासनाने शहरातील दाकियाओदाओ या फूड कंपनीला सील केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टियानजिन डकियाडो फूड कंपनीकडून ४ हजार ८३६ आईसस्क्रीमचे डबे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले आहेत. त्यातील २ हजार ८९ डबे स्टोरेजमध्येच सील करण्यात आले तर चीनच्या माध्यमानुसार संक्रमित डब्यांपैकी १ हजार ८१२ डबे दुसऱ्या राज्यात पाठवण्यात आले आहेत, ९३५ डबे स्थानिक बाजारात आले आहेत, त्यातील ६५ डब्ब्यांची विक्रीही झाली आहे.

दरम्यान, संक्रमित बॉक्समधील अद्याप फक्त ६५ बॉक्सचीच विक्री झाल्याचे उघड झाले आहे. ही बातमी समजताच कंपनीने १६६२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या आईस्क्रीम बॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध घेतला जात आहे.

390 डब्यांचा शोध सुरु

चीन सरकारने या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं, “कंपनीच्या या बॅचच्या २९,००० डब्यांपैकी अधिकाधिक डबे विकले गेलेले नाहीत. त्यातील केवळ ३९० डब्यांचीच तियानजिनमध्ये विक्री झाली. या आइस्क्रीममध्ये न्यूझीलंडमधील दूध पावडर आणि यूक्रेनची ताक पावडर वापरण्यात आली होती.”

अस का झालं?

कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानचं आईस्क्रीमही संक्रमित झालं असावं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेची योग्य खबरदारी घेतली नसल्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

आईस्क्रीमला थंड हवामानात ठेवण्यात येत असल्यानं त्यामध्ये व्हायरस जीवंत राहण्याची शक्यता जास्त आहे. मात्र यामध्ये घाबरण्याची गरज नाही, असं आवाहानही तज्ज्ञांनी केलं आहे.

आईस्क्रीममधी कोरोना विषाणूचं खापर चीनकडून इतर देशांवर

चीनने म्हटलं, “हा आजार इतर देशांमधून आमच्याकडे आला. आयात केलेले मासे आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये कोरोना विषाणू सापडला.” असं असलं तरी आंतरराष्ट्रीय संशोधकांना यावर संशय आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण वुहानमध्ये २०१९ मध्ये सापडला होता.

 

श्रीविजया एअरलाइन्सचे विमान समुद्रात कोसळले,विमानात 62 प्रवासी


नवी दिल्ली : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजया एअरचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची दाट शक्यता आहे. बोईंग 737 प्रकारच्या या विमानात 62 प्रवासी होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात 10 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते 10 हजार फुटापेक्षा पण खाली आले आहे.

या विमानात सात लहान मुले, सहा क्रू सदस्यांसह एकूण 62 प्रवाशांचा समावेश होता. हे सर्व प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. विमानाने उड्डाण घेताच अवघ्या चौथ्या मिनिटातच त्याचा एटीसीशी संपर्क तुटला होता.जाकार्तानजीकच खोल समुद्रात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सांगाडे आणि मानवी अवयव आढळून आल्याने विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याची माहिती इंडोनेशियन तटरक्षक दलाच्या त्रिसुला गस्ती नौकेचे कमांडर एको सूर्या हादी यांनी दिली आहे.

बोईंग 737-500 विमानाने सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन उड्डाण केले होते. फ्लाइट ट्रॅकर वेबसाइट फ्लाइट्रॅडार 24 च्या माहितीनुसार, विमानाने एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10,000 फूट उंची गाठली होती.विमानांवर नजर ठेवणाऱया फ्लाइट रायडर 24ने दिलेल्या वृत्तानुसार विमान तांत्रिक बिघाडामुळे अचानक खाली कोसळल्याचे संकेत मिळाले होते. अखेर एटीसीची भीती खरी ठरल्याचे तटरक्षक दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.श्रीविजय एअरलाईन्सने सांगितलं की, या घटनेसंदर्भात सर्व माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

या विमानामुळे इंजिनाची बचत होत असली तरी या विमानाच्या इंजिनमध्ये समस्या असल्याने हे विमान बरेच चर्चेत राहिले आहे. इंजिनातील समस्येमुळे विमानाचा वेग कमी होऊ शकतो, तसेच विमान बंददेखील पडू शकते. ही समस्या दूर करण्यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर विमानात बसवले होते. मात्र अनेकदा हे सॉफ्टवेअरदेखील चुकीचे निर्देश देत असल्याचे आढळून आले होते. याच कारणामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली


मुंबई : जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी सांगितले.

राजदूत झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

कोरोना उद्रेकानंतर भारताप्रमाणेच जॉर्जियाने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र देशात आज ५ ते ७ हजार कोरोना रुग्ण असल्याचे सांगून भारताने कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याबद्दल जॉर्जियाला मदत करावी असे राजदूतांनी सांगितले.

भारत व जॉर्जियाचे संबंध पूर्वापार दृढ असल्याचे सांगून उभय देश बंदर विकास, तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांत लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण देखील जॉर्जियात झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉर्जियाच्या राजदूतांचे स्वागत करताना भारत व जॉर्जिया देशांमध्ये बंदर विकास, उत्पादन क्षेत्र तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असली तरी देखील देशाने कोरोनाचा मुकाबला समर्थपणे केल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

जॉर्जियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सतिंदर सिंह आहुजा देखील बैठकीला उपस्थित होते.