पुण्यात प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन प्रेयसीकडून कोयत्याने वार
पुणे : प्रियकराच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय प्रेयसीने 19 वर्षीय तरुणावर हातात कोयता घेऊन प्राणघातक हल्ला केला.हडपसर परिसरातील काळेपडळमध्ये रविवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तरुणीसह चौघेजण अल्पवयीन आहेत.
विठ्ठल धनंजय चौगुले (वय 19), ऋषिकेश उर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय 20) आणि चैतन्य तुळशीराम कराड (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर 17 वर्षीय तरुणीसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन प्रविण जगताप (वय 19) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
एप्रिल महिन्यात सनी हिवाळे याचा हडपसर परिसरात निर्घृण खून करण्यात आला होता. सनी हिवाळे हा सराईत गुन्हेगार असून नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने हा सर्व कट रचला. फिर्यादी तरुण हा सनी हिवाळेच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा संशय तिला होता. यातून तिने इतर आरोपींना हाताशी धरून हा सर्व प्रकार घडून आणला.
रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण काळेपडळ परिसरातील ढवळे फ्रुट स्टॉल जवळ थांबला होता. त्याच वेळी ती तरुणी इतर आरोपींना घेऊन त्या ठिकाणी आली आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरुण घाबरून फ्रुट स्टॉल चा दुकानात शिरला आणि त्याने शटर बंद करून घेतले.
त्यानंतरही आरोपी प्रेयसी बंद शटरवर कोयत्याने वार करत राहीली. ‘तु सनीच्या मर्डरच्या कटात सामील होता, मी तुला जिवंत सोडणार नाही, आता मला कशाची भीती नाही तसेच जर कोणी मध्ये आला तर मी कोणाला सोडणार नाही’ असे म्हणून शटरवर वारंवार कोयत्याने वार करून शटर उघडण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराने परिसरात काळेपडळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.