- October 30, 2022
- No Comment
इंस्टाग्रामवर पिस्तूल विक्रीची जाहिरात करणारे त्रिकुट गजाआड
पिंपरी- चिंचवड: इंस्टाग्रामवर पिस्तूल विक्रीची जाहिरात करणे एका सराईत गुन्हेगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण ही जाहिरात पाहून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तूल , एक मॅक्झिन आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.
खंडू अशोक कालेकर (24, रा. काले कॉलनी, पवनानगर, मावळ), अक्षय ऊर्फ दादा साहेबराव सुर्वे (24, रा. संकुल सोसायटी, भुगाव, मुळशी), शुभम गणेश खडके (विघ्नहर्ता पार्क सोसायटी, मुळशी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी कालेकर हा सराईत गुन्हेगार आहे. तसेच, तो सोशल मीडियावर नेहमी अॅॅक्टिव्ह असतो. त्यामुळे गुंडाविरोधी पथक त्याच्या हालचालींवर वॉच ठेवून होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कालेकर याने इंस्टाग्रामवर पिस्तूल विक्रीची एक जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ‘ब्रेटा’ मॉडेलची एक पिस्तूल आणि त्याखाली किंमत दिली होती. ही जाहिरात पहिल्यानंतर गुंडविरोधी पथकाने माहिती घेतली असता आरोपी कालेकर याने विक्रीसाठी मध्य प्रदेश येथून 6 गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली. तसेच, कालेकर हा थेरगाव येथील डांगे चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅक्झिन, नऊ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तुषार ऊर्फ आप्पा गोगावले (रा. नवले ब्रिज, पुणे) याला तीन पिस्तूल आणि बारा काडतुसे विक्री केल्याचे कबुली दिली.