- March 16, 2025
- No Comment
चक्क अफूची शेती; प्लॉटिंग केलेल्या मागील बाजूस अफूची 66 झाडे

लोणी काळभोर: शहरापासून जवळच असलेल्या व प्लॉटिंगचे मागील बाजूस असलेल्या जमिनीमध्ये चक्क अफुची शेती केली जात असल्याचे आढळून आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडवर छापा घालून ही अफुची शेती उघडकीस आणली.
आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडच्या कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांच्या प्लॉटिंगच्या मागील बाजूला अफूची लागवड केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली.
या खबरीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा घालून कारवाई केली. आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकूण ४० हजार रुपयांची ४ किलोग्रॅम वजनाचे ६६ अफूची झाडे मिळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त केली आहे.
जमीन मालक मंगल दादासो जवळकर (वय ४५, रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगल जवळकर यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार क्षीरसागर, वणवे, सातपुते, पोलीस अंमलदार कटके, कुदळे, नानापूरे, निकंबे, यादव, तेलंगे यांनी केली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अफूची लागवड करणार्या लोकांविरुद्ध दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.