- March 15, 2025
- No Comment
पत्नीच्या अफेअरच्या कारणावरुन झालेल्या वादात हवेत केला गोळीबार, लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक

पुणे: पत्नीचे दुसर्याशी असलेल्या अफेअरमध्ये मध्यस्थ करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकाने हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश संजय चौधरी (वय २९, रा. वाडेबोल्हाई, ता़ हवेली), ओंकार अंकुश लांडगे (वय २५, रा. वाडे बोल्हाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्यांचा मित्र गणेश चौधरी यास त्याच्या पत्नीचे फिर्यादीच्या मित्राबरोबर अफेअर असल्याचा संशय आहे. तो फिर्यादी कडून त्याच्या पत्नीचे व ज्याचेबरोबर अफेअर आहे, त्यांचे फोटो व इतर माहिती फिर्यादीकडून घेऊन त्यानंतर त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे फिर्यादीला समजले. फिर्यादी यांनी गणेश चौधरी याला झेप्टो कंपनी येथील कटकेवाडी फाटाला बोलवले होते. गणेश चौधरी बरोबर त्याची एक मैत्रिण व एक अनोळखी तरुण होता. मित्राची माहिती घेण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा फिर्यादी यांनी गणेश चौधरी याच्या कानाखाली मारली. त्यानंतर दुसर्या दिवशी गणेश चौधरी याने फिर्यादीला फोन करुन शिवीगाळ केली होती.
त्यानंतर १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता गणेश चौधरी हा काही मुले घेऊन फिर्यादीला शोधत असल्याचे समजले. त्यानंतर गणेश चौधरीचा फोन आला व म्हणाला की आपले काही नाही, मी तुला मारायला आलेलो नाही, मी कटकेवाडी येथे आलो आहे, आपण थोड्या वेळाने भेटू व काही असेल तर मिटवून टाकू, परंतु, त्यादिवशी तो आला नाही. त्यानंतर १३ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता ते वाडेबोल्हाई येथील जुन्या बोल्हाई माता मंदिराजवळ गेले. तेथे गणेश चौधरी ओंकार लांडगे होते. फिर्यादी यांनी चौधरीला बकोरी येथे मला शोधण्यासाठी दुसरे मुले कोण होती, असे विचारत असताना त्यांच्यात शिवीगाळ, बाचाबाची झाली. तेव्हा वाडे बोल्हाई मंदिराकडून चौघे जण आले. त्यांच्यातील एकाने पिस्तुल काढून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यामुळे सर्वांची पळापळ झाली. जुनैद शेख हा मोटारसायकलवरुन जात असताना त्यास खाली पाडुन त्यांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करुन पळून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.