- December 11, 2025
- No Comment
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना
पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ४ डिसेंबर रोजी घडली असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्या दोघांची ओळख एका बस स्टॉप वर झाली होती. ४ डिसेंबर रोजी आरोपीने तिला शाळेत सोडतो असे सांगितले. आरोपी तरुण ओळखीचा असल्याने पीडितेने डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या गाडीवर बसली. मात्र तरुणाने मुलीचा विश्वासघात केला. मुलीला गाडीवर बसून एका निर्जनस्थळी नेले. या तरुणाने पीडित मुलीला एका खोलीत नेले आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. अत्याचारानंतर पीडित मुलीने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.