- September 16, 2022
- No Comment
बनावट पोलीस असल्याचे सांगून लुबाडणारे सहा टाळक्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी: पोलीस असल्याचे खोट सांगत लॉजची तपासणी करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगीराज लॉज देहू फाटा, आळंदी येथे घडली.
प्रल्हाद रामदास तांदळे (वय 34, रा. गुंजाळ वस्ती, वारजे माळवाडी, पुणे), प्रथमेश राजेश जोशी (वय 20, रा. सिंहगड रोड, पुणे), विजय आनंद धोत्रे (वय 19, रा. जाधवनगर, पुणे) आणि तीन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राम अरुण काळे (वय 24, रा. देवाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. 14) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी योगीराज लॉज येथे गेले. त्यांनी फिर्यादी यांना पोलीस असल्याची बतावणी करून लॉजमधील सर्व रजिस्टरची तपासणी केली. तसेच लॉजमध्ये आलेल्या ग्राहकांकडेही चौकशी केली. मात्र लॉजच्या मालकाला संशय आल्याने त्यांनी लॉज असोसिएशनची संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर असोसिएशनने दिघी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता आपण एका अशासकीय संस्थेचे सदस्य असून लॉजची तपासणी करत असल्याचे सांगितले.
आणखी एका लॉज चालकास लुटले बनावट पोलिसांच्या टोळीची माहिती मिळताच लॉजचे चालक-मालक हे दिघी पोलीस ठाण्यात आले. त्यापैकी एका लॉज चालकाकडून आरोपींनी यापूर्वी 30 हजार रुपये उकळणलयाचे समोर आले. याप्रकरणी संबंधित लॉज मालकाने दिघी पोलीसांकडे अर्ज दिला आहे. या अर्जाची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिघी पोलिसांनी लॉज असोसिएशनला दिले आहे.