- December 22, 2024
- No Comment
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना
महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब ग्राहक पात्र ठरणार आहेत.
1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे 01.04.2023 ते 31.03.2024 या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन काढण्यात येणार आहेत.
प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआरकोड, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन वीजबिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक राहील. वीजबिलाची किमान रक्कम 100 रुपये असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम 10 पेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.