- September 23, 2022
- No Comment
रावेत: अमेरिकेतून इंजेक्शन मिळवून देण्याचे सांगत तरुणाची दीड कोटींची फसवणूक
रावेत: एका दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी वापरले जाणारे जोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतून मिळवून देण्याच्या बहाण्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना 25 ऑगस्ट 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडली.
अमित शांतारामजी रामटेककर (वय 34, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात 20 सप्टेंबर 2022 रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एस लक्ष्मी कंथन (रा. कोईम्बतूर, तामिळनाडू) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी टाईप एक नावाचा आजार आहे. त्या आजारावर उपयोगी ठरणारे जोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतील नोवायटीस या कंपनीत मिळते. त्या कंपनीतून इंजेक्शन मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादी यांना अमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून तब्बल दीड कोटी रुपये आरोपीने घेतले. ती रक्कम अमेरिकेतील कंपनीला पाठवली नाही. फिर्यादी यांनी आरोपीला पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फोन बंद करून फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.