- September 29, 2022
- No Comment
पवना नदीत पुरुषाचा सापडला मृतदेह,ओळख अजुनही अस्पष्ट
कासारवाडी: कासारवाडी जवळील पवना नदीत एका पुरुषाचा मृतदेह सापडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक बाळासाहेब वैद्य यांनी सांगितले, की साडेदहाच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कळविले, की कासरवाडीमधील स्मशानभूमीच्या मागील पवना नदीमध्ये एक मृतदेह आहे.
त्यामुळे एक रेस्क्यू व्हेईकल घटनास्थळी पाठविण्यात आली होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह एका पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे 35 वर्ष असावे. ती व्यक्ती अंदाजे दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडाली असावी. कारण मृतदेह कुजण्याच्या मार्गावर होता. मृतदेहावर माशांनी डोक्यावर व पाठीवर कुरतडल्याचे दिसत होते. त्या व्यक्तीने लाल शर्ट व निळी जीन्स घातली होती. तसेच, पायात ग्रे कलरचे पॅरेगॉन चप्पल होती. मृतदेह औंध रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आलेला आहे.
त्या व्यक्तीच्या अंगावर कुठेही जखमा किंवा गोंदण्याचे व्रण नव्हते. शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.