- September 29, 2022
- No Comment
धक्कादायक! जन्मदेता बापच निघाला मारेकरी
शिक्रापूर: बेपत्ता असलेल्या एका चिमुरडीचा तिच्या बापानेच खून केल्याचे उघडकीस आले आज. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथून ही सात वर्षाची बालिका मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके ही बालिका बेपत्ता झाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र मुलगी मिळाली नाही. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान तपास सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीचे वडिल तिला नदीच्या कडेला नेत असल्याचे दिसुन आले होते. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता मुलीच्या वडिलांनीच मुलीला वेळ नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेत पाहणी केले असता मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आलेला नाही.
तर शिक्रापूर पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले असून पुढील तपास शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.