- October 24, 2022
- No Comment
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आठशे जागांची भरती
पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 859 पैकी 801 रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पदांच्या भरतीसाठी याआधी 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या जाहिरातीनुसारची सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत नमूद केलेल्या विविध पाच संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया नव्याने सुरु केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पातळीवर भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला जाणार आहे.
या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (वेगवेगळे दोन संवर्ग), आरोग्यसेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांचे वेगवेगळे 12 संवर्ग आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (तीन संवर्ग), आरोग्यसेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ पाच संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याआधी सन 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे.
पुढिल भरली जाणारी पदे
- आरोग्यसेवक — 262
- आरोग्यसेविका — 503
- औषध निर्माता — 29
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ — 04
- आरोग्य पर्यवेक्षक — 03
एकूण जागा — 801