- October 27, 2022
- No Comment
माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन
पुणे: पुण्यातील माजी आमदार विनायक महादेव निम्हण (वय 59) यांचे (बुधवारी) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा विभानसभेवर निवडून गेले होते.
विनायक निम्हण यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री नऊ वाजता पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनायक निम्हण यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण, मुलगा माजी नगरसेवक चंद्रशेखर तथा सनी निम्हण तसेच मधुरा व गायत्री या कन्या तसेच सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक अमित गावडे व उद्योजक राहुल गावडे यांचे ते मामा होत.
विनायक निम्हण यांनी सोमेश्वर फाऊंडेशनची स्थापना करून पाषाण परिसरात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. शिवसेना शाखाप्रमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. 1995 मध्ये ते शिवसेनेचे विभागप्रमुख झाले. 1999 मध्ये सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले.
शिवसेनेच्या तिकिटावर ते दोनदा निवडून आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. नारायण राणे यांच्या समवेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेसच्या तिकीटावर एकदा विधानसभेवर निवडून गेले होते.
सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. जनसामान्यांसाठी लढणारा एक लढाऊ नेता अशी त्यांची ओळख होती. ‘आबा’ या टोपणनावाने ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनामुळे पाषाण परिसरावर शोककळा पसरली आहे.