- October 31, 2022
- No Comment
कोयत्याने वार करून गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा खून
धायरी: पुण्यातील धायरी परिसरात शनिवारी मध्यरात्री खुनाचा थरार उघडकीस आला आहे. हॉटेलमधील काम संपवून घरी निघालेल्या गारवा बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
भरत भगवान कदम (वय 24) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड असता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत व्यक्तीचा भाऊ प्रकाश कदम यांनी फिर्यादी आहे.
पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिलेली माहिती अशी की, भरत कदम हे गारवा बिर्याणी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी धायरी परिसरातील पारे कंपनी चौकाजवळ हल्लेखोर आणि त्यांचा रस्ता अडवला आणि कोयत्याने वार केले. डोक्यात वार बसल्याने भरत कदम जागीच कोसळले होते. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
सिंहगड पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर, भरत कदम यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. भरत कदम यांच्या खिशातील पैसे आणि इतर साहित्य जागेवरच पडून होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नसावा असा प्राथमिक अंदाज आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.