- October 31, 2022
- No Comment
किरकोळ कारणावरून विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार, आरोपी गजाआड
खेड: माशाचे गिर्हाइक पळवल्याच्या वादातून एका मासे विक्रेत्याने दुसऱ्या मासे विक्रेत्यावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून हा प्रकार उघडकीस आला.या घटनेत एक मासे विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
अमन मोमीन आणि सुफियान मोमी अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनी केलेल्या हल्ल्यात सोयल रफिक मोमीन (वय 26) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेड गावात आरोपी आणि फिर्यादी यांचे मासे विक्रीचे दुकान आहे. दोघांचेही अगदी शेजारी शेजारी दुकान आहे. दरम्यान, सोहेल मोमीन हा आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना पोस्ट लावून ग्राहक पळवतो असा संशय आरोपींना होता. शुक्रवारी सायंकाळी देखील त्यांच्या याच कारणावरून भांडण झाले होते.
त्यानंतर आरोपींनी माझे ग्राहक पळवतो थांब तुला मारूनच टाकतो असे म्हणत थेट त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर खेड येथील बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला दोघांना अटक केली आहे