- December 23, 2024
- No Comment
पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी किंवा मृत झाल्यास… देणार आर्थिक मदत
पुणे: पुणे शहरात नैसर्गिक दुर्घटना किंवा प्राण्यांच्या हल्याच जखमी झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात झाड पडून अथवा महापालिकेच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अथवा संबंधित व्यक्ती जखमी झाल्यास त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च तसेच संबंधित व्यक्तींंच्या कुटुंबियांना महापालिकेकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने स्थायी समितीत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी आरोग्य विभागास दिले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्यात अनेक जण जखमी
कात्रज, येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. दत्तवाडी येथे एका ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून कुत्र्यांनी हल्ला केला होता. तर काही दिवसांपूर्वी एका तीन वर्षाच्या लहान मुलीवर हल्ला केला होता. तर, गुरूवारी रात्री कात्रज परिसरात एका पाच वर्षाच्या मुलांवर हल्ला केला असून यात तो लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर साडेसतरानळी येथील निवृत्त शिक्षक काळुराम जगताप मॉर्निंग वॉक करताना कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले.
त्यामुळे यापुढे अशा गंभीर घडल्यास संबंधित व्यक्तीवर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतील पॅनेलवरील रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. तर, एखादी व्यक्ती झाड पडून, खड्डयात पडून अथवा पालिकेच्या कामातील चुकीमुळे जखमी झाल्यास त्याचाही खर्च महापालिका करणार आहे. संबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांंना तत्काळ मदत करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
2025-26 या वर्षाच्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दुर्घटनाग्रस्तांसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे महानगर पालिकेला तत्काळ मदत करता येत नाही. त्याचबरोबर या मदतीसाठी वेगवेगळ्या मान्यता घ्याव्या लागतात. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी या मदतीसाठी 2025-26 या वर्षाच्या अंदाजपत्रकात तत्काळ बजेटहेड उघडण्यासह त्यासाठी निधीही प्रस्तावित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहिती आहे.