• November 30, 2022
  • No Comment

आता तत्काळ पासपोर्टसाठी लागणार तीनच कागदपत्रे

आता तत्काळ पासपोर्टसाठी लागणार तीनच कागदपत्रे

    पुणे – क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयांतर्गत सर्व केंद्रांमधून तत्काळ
    योजनेअंतर्गत पासपोर्ट काढण्यासाठी १८ वर्षांपेक्षा जास्त
    वयाच्या अर्जदारांना १३ पैकी कोणतीही तीन सरकारी कागदपत्रे
    तर, त्यापेक्षा कमी वयाच्या अर्जदारांना पहिल्या सहामधील
    कोणतीही दोन सरकारी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक
    आहे. दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयाकडून पासपोर्ट जारी करण्याचे
    प्रमाणही वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा महिन्यांतच
    ऑक्टोबरअखेर ५० हजारांहून अधिक नागरिकांनी पासपोर्ट
    घेतला आहे.
    पासपोर्ट काढण्यासाठी एजंट नागरिकांकडून अधिक पैसे
    उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे
    नागरिकांची लुबाडणूक होवू नये, यासाठी सामान्य आणि
    तत्काळ पासपोर्टसाठी नेमकी किती कागदपत्रे लागतात, त्याची
    प्रक्रिया कशी असते, याबाबतची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट
    अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी दिली.

    कागदपत्रांची यादी (यापैकी प्रौढांसाठी तीन आणि १८ वर्षापेक्षा
    लहानांसाठी दोन) :
    १. युआयडीएआय यांच्याद्वारे जारी केलेले पीव्हीसी आधार कार्ड,
    संपूर्ण मूळ आधार कार्ड किंवा डिजिटल स्वाक्षरी सत्यापित
    चिन्हासह जारी केलेले ई-आधार कार्ड (लहान कापलेले आधार
    कार्ड किंवा बाहेरून बनवलेले स्मार्ट कार्ड स्वीकारले जाणार
    नाही) २. पॅन कार्ड, ३. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी जारी
    केलेले विद्यार्थी फोटो ओळखपत्र, ४. जन्म प्रमाणपत्र, ५. रेशन
    कार्ड, ६. शेवटचा जारी केला गेलेला पासपोर्ट (फक्त पासपोर्ट
    पुन्हा जारी करण्यासाठी), ७. मतदार ओळखपत्र, ८. राज्य/केंद्र
    सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, स्थानिक संस्थांद्वारे जारी
    केलेले फोटो ओळखपत्र, ९. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
    किंवा इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र, १०. शस्त्र परवाना, ११.
    निवृत्ती वेतन प्रमाणपत्र (माजी सैनिकांचे पेन्शन बुक किंवा निवृत्त
    सरकारी कर्मचारी, माजी सैनिकांची विधवा प्रमाणपत्र,
    वृद्धापकाळ पेन्शन पेमेंट ऑर्डर), १२. बँक पासबुक, किसान
    पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, १३. वाहन परवाना
    (महाराष्ट्रातील).

    सर्व कागदपत्रांमध्ये पूर्ण नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव
    सारखेच असावे.


    किमान एकामध्ये सध्याचा पत्ता नमूद असावा.
    तत्काळच्या अपॉईंटमेंटसाठी तीन (१८ वर्षांपर्यंत दोन)
    कागदपत्रे नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
    पासपोर्ट सेवा केंद्रे शनिवारी सुरू –
    नवीन अपॉइंटमेंट्सचे प्रमाण वाढले आहे. प्रलंबित प्रकरणे वेळेत
    पूर्ण व्हावीत, यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयांतर्गत सर्व
    पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे
    शनिवारी (ता. ३) सुरू ठेवण्यात येणार आहेत. यादिवशी
    अर्जदारांना सामान्य आणि तत्काळमध्ये नवीन अपॉइंटमेंट्स घेता
    येतील.

    संकेतस्थळ https://www.passportindia.gov.in/
    पुणे क्षेत्रीय पासपोर्ट मुख्य कार्यालय : बाणेर
    पासपोर्ट सेवा केंद्रे : मुंढवा आणि सोलापूर
    लघु कार्यालये : नगर, बारामती, बीड, इचलकरंजी, जालना,
    कोल्हापूर, लातूर, माढा, नांदेड, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी,
    पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, शिरूर आणि श्रीरामपूर येथे
    पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र

    पुणे क्षेत्रीय
    कार्यालयांतर्गत जारी पासपोर्ट
    जानेवारी ते डिसेंबर २०२१ : २.३१ लाख
    जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ : २.८० लाख
    सामान्य पासपोर्टसाठी कागदपत्रे-

    आधार कार्ड (सध्याच्या पत्त्यासह) आणि एसएससी किंवा
    अधिक शिक्षण हे दोन प्रमाणपत्र पुरेसे आहेत. परंतु, सर्व
    कागदपत्रांमध्ये पूर्ण नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव सारखेच
    असावे.
    सामान्य पासपोर्टसाठी शुल्क: १ हजार ५०० रुपये
    तत्काळ पासपोर्टसाठी शुल्क: २ हजार रुपये

    अर्जदार सामान्य आणि तत्काळ या दोन्ही श्रेणींमध्ये 3 डिसेंबर
    साठी नवीन अपॉइंटमेंट्स घेता येतील. आधीच बुक केलेल्या
    अर्जदार रिशेड्यूल करू शकतील. नवीन अपॉइंटमेंट घेऊ
    इच्छिणाऱ्यांनी प्रथम https://www.passportindia.gov.in/
    येथे ऑनलाइन अर्ज भरून ऑनलाइन रक्कम भरावी. त्यानंतर,
    अर्जदारांनी रक्कम भरल्याची खात्री करण्यासोबतच अपॉइंटमेंट
    निश्चित करण्यासाठी https://www.passportindia.gov.in/
    संकेतस्थळावर पुन्हा लॉग इन करावे. अपॉइंटमेंट मिळाल्याची
    खात्री संकेतस्थळावर करता येईल. ज्या अर्जदारांनी अपॉईंटमेंट्स
    आधीच बुक केल्या आहेत, ते त्यांच्या अपॉईंटमेंट्स एकदाच
    रिशेड्युल करू शकतील. अर्जदार अपॉइंटमेंटसाठी हजर न
    झाल्यास त्यांना अपॉईंटमेंट्स रिशेड्यूल करण्याची परत संधी
    दिली जाणार नाही. अशा अर्जदारांचे शुल्क परत करण्यात येणार
    नाही.
    बहुतेक अर्जदार सामान्य श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतात.
    सामान्य श्रेणीसाठी साधारण दोन कागदपत्रे आवश्यक आहेत
    आणि कमी शुल्क भरावे लागते. पोलिस पडताळणी अहवाल
    मिळाल्यानंतर, आम्ही लगेच पासपोर्टदेखील पाठवतो. खरं तर,
    पासपोर्ट सेवा केंद्र पुणे येथे सामान्य अपॉइंटमेंट तत्काळपेक्षा
    लवकर उपलब्ध आहे.

    – डॉ. अर्जुन देवरे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे.

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *