- December 12, 2022
- No Comment
व्यापार्याला मृत दाखवून जमीन हडपण्याचा प्रयत्न, आरोपीला जेरबंद
बंडगार्डन: जिवंत व्यापार्याला मृत दाखवून त्याच्या बनावट मृत्यूपत्राच्या आधारे वाघोली येथील तीन एकर जमिन लाटण्याचा प्रयत्न करणार्या एकाला बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अटक केली.
आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून यापुर्वी देखील त्याने अशा फसवणूकीचा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
प्रतापचंद बभूतमल मारवाडी (जैन) (रा. कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत चिंचवड येथील 72 वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे व्यापारी आहेत. त्यांच्यासह नातेवाईकांची वाघोली परिसरात तीन एकर जागा आहे. आरोपी जैन याने या जमिनीच्या मालकाची माहिती काढली. यानंतर जिवंत असलेल्या जमिन मालकाचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसा प्रमाणपत्र बनविले.
यासाठी मारवाडी याने इतर काही साथीदारांची मदत घेतली. मात्र, फिर्यादी यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी ऑगस्ट महिन्यात बंडगार्डन पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तेव्हापासून आरोपी फरार होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक निरीक्षक दिपक बर्गे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. यानूसार बर्गे, उपनिरीक्षक रविंद्र गावडे, अंमलदार शिवाजी सरक यांच्यासह पथकाने सापळा रचून आरोपी मारवाडी याला काशेवाडी भागातून अटक केली.
त्याची चौकशी केल्यानंतर आरोपीने यापूर्वी देखील अशाप्रकारे फसवणूक केली असून त्याच्यावर कोथरूड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. बंडगार्डन पोलिसांनी मारवाडी याला अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, मोहन काळे, नितीन जगताप, अमोल सरडे, ज्ञाना बडे यांच्यासह पथकाने केली.