- December 12, 2022
- No Comment
मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या टोळीचा म्होरक्या गजाआड
बिबवेवाडी: बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार करणार्या अनिल चव्हाण टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात फरार असलेल्या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदाराला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
टोळीचा म्होरक्या अनिल रमेश चव्हाण (21, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), रोहित हेमंद बोदरे (20, रा. गुजर वस्ती, कात्रज कोंढवा रोड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण हा त्याच्या नेतृत्वाखाली टोळी तयार करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवित होता. तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही टोळी गुन्हे करत होती. या टोळीच्या सात जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु, टोळीचा म्होरक्या अनिल चव्हाण आणि त्याचा साथीदार रोहित बोदरे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्या दोघांचा शोध घेत असताना बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अमंलदार अतुल महांगडे यांना गुन्हात फरार असलेला रोहित बोदरे हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला व त्याच्यासोबत असलेल्या अनिल चव्हाण याला बोदरे याच्या घराजवळून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ निरीक्षक संगिता जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार जाधव, येवले, मोरे, पाटील काळे, नवले , धुमाळ यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे करत आहेत.