- March 11, 2023
- No Comment
पैसे उकळून सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली
पुण्यात सध्या लैंगिक छळाच्या आणि बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धमकावून, पैसे उकळून सहकारी महिलेवर बलात्कार करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. इस्माईल अब्दुल रहेमान करजगी असे शिक्षा झालेल्याचं नाव आहे. या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ज्युनियर सहकारी असणाऱ्या महिलेवर या इस्माईल करजगी याने अनेकदा धमकवलं होतं आणि तिच्यावर बलात्कार केला होता. दोघेही एकाच कंपनीमध्ये 2010 मध्ये नोकरीला होते. या कंपनीत करगजी हा त्या महिलेचा सिनियर सहकारी होता. त्याने तरुणीकडे उसने पैसे मागितले होते. या तरुणीने पैसेही दिले. त्याची एक मैत्रिण सिंहगड रोड येथील सदनिकेवर येणार आहे, तू पण चल असे खोटे बोलून तिला तो घेऊन गेला. तेथे कोणीही नव्हते. तिथे आरोपीने पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून, धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
पतीला पाठवला मेल
काही दिवसांनी या तरुणीचं लग्न झालं, त्यानंतर आरोपीने तरुणीच्या पतीला ऑफिसमधून मेल पाठवला. त्यात ऑफिसमधील एका कार्यक्रमाचा फोटो पाठवला. त्यात त्याने ‘‘ये तो अभी शुरुवात है, अभी तो बहुत फोटो और व्हिडीओ बाकी है’’ असे म्हटले आणि पैशांची मागणी केली होती. त्यानंतर पतीने तरुणीला या सगळ्या प्रकाराबाबत विचारलं. ब्लॅकमेक करतो, धमक्या देतो, कुटुंबीयांना मारुन टाकण्याच्या धमक्या देतो, पीडित महिलेच्या बहिणीचे लग्न ठरलेले असताना तिचे लग्न होऊ देणार नाही, असे धमक्या देत असल्याने घाबरुन हा प्रकार सांगितला नसल्याचे पतीला सांगितले. त्यानंतर पतीनेच या सगळ्या प्रकारासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणीचा पती हा प्रकार समजल्यावर तिच्या पाठीशी उभा राहिला. दरम्यान हा खटला रेंगाळला. खटल्याची सुनावणी सुरु झाली तेव्हा पीडितेचा पती अमेरिकेत होता. त्याने तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविली होती.
13 वर्षांनी मिळाला न्याय
हा प्रकार 2010 मध्ये घडला होता. त्यानंतर अनेक दिवसांनी तक्रार दाखल केली होती. त्यादरम्यान हा खटला चांगलाच लांबला, मात्र नराधमाला शिक्षा झालीच. अशाच प्रकारे बलात्कार करणाऱ्या नराधमाला शिक्ष झाली पाहिजे, अशा भावना सर्व स्तरावरुन उमटत आहे. मात्र शिक्षा होण्यासाठी एवढा काळ लागू नये,असंही अनेकांचं मत आहे.