- March 11, 2023
- No Comment
चैन हिसकावण्यासाठी आलेल्या चोराला वृद्ध महिला आणि 10 वर्षीय मुलीने चांगलाच चोप दिला
चेन स्नॅचिंगच्या घटना आपल्याला सहसा ऐकायला मिळतात. अशीच एक घटना पुणे शहरात पाहायला मिळाली आहे. चैन हिसकावण्यासाठी आलेल्या चोराला वृद्ध महिला आणि 10 वर्षीय मुलीने चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चेन स्नॅचिंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत रात्री आठच्या सुमारास एक वृद्ध महिला आपल्या दोन नातवंडांसह घरी परतत असताना ही घटना घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचचा प्रयत्न केला. दरम्यान स्कूटीवर बसलेला एक व्यक्ती एका वृद्ध महिलेजवळ थांबला आणि तिला कुठल्यातरी जागेचा पत्ता विचारु लागला. महिला गाडीजवळ येताच त्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यावर जोरात वार करुन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, वृद्ध महिलेने आरोपीचा हात पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वृद्ध महिलेसोबत उभी असलेली 10 वर्षांची मुलगीही आरोपीवर तुटून पडली आणि तिच्या हातातील पिशवी घेऊन तिला मारहाण करु लागली. दुसरीकडे आरोपीने स्वतःला घेरलेले पाहून घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.

ही घटना 25 फेब्रुवारीला घडली आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयता गॅंगची दहशत असतानाच आता शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात असे प्रकार घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुनसान रस्त्यावर अनेकदा असे प्रकार समोर येत आहेत. भर दुपारी नाही तर रात्रीच्या वेळेत हे चोर थेट वृद्ध महिलांवर हल्ला करुन किंवा त्यांना दमदाटी करुन त्यांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु आहे.