- March 30, 2023
- No Comment
मोक्षदा पाटील आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार
सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचे बनावट खाते तयार करून पैशांची मागणी करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात अधिकच वाढले आहे. मात्र आता तर चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले होते.त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या सायबर भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तर ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नयेत, असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले आहे. मात्र तोपर्यंत अनेकांची फसवणूक झाली होती.