- March 31, 2023
- No Comment
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडून साडेसतरा लाख रुपये उकळले
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडून साडेसतरा लाख रुपये उकळणाऱ्या वकिलास हडपसर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. विक्रम भाटे (वय ३५, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी निधी दीक्षित (वय २५, रा. वाघोली) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी तीन ऑगस्ट रोजी तक्रारदार, त्याचा मित्र आणि मैत्रीण सिझन माॅलमधील उपहारगृहात गेले होते. त्या वेळी निधी दीक्षीतची व्यावसायिकाशी ओळख झाली. तिने व्यावसायिकाचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर व्यावसायिक आणि आरोपी निधी यांच्यातील संवाद वाढला.
तिने व्यवसायाबाबत बोलयाचे आहे, असे सांगून व्यावसायिकाला वाघोलीतील सदनिकेवर नेले. तेथे निधीने व्यावसायिकाबरोबर छायाचित्रे काढली. त्यानंतर निशा गुप्ता नावाच्या तरुणीच्या मोबाइल क्रमांकावरुन ॲड. विक्रम भाटेने व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांंकावर संपर्क साधला. निधीने तुमच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणात तुम्हाला जामीन मिळणार नाही. हे प्रकरण मिटावयचे असेल तर मी तुम्हाला मदत करतो, असे ॲड. भाटे याने सांगितले. व्यावसायिकाकडून आठ लाख रुपये उकळले. त्यानंतर ॲड. भाटे व्यावसायिकाला धमकावत राहिला. सर्वोच्च न्यायालयात देखील जामीन मिळणार नाही, असे सांगून व्यावसायिकाकडे पुन्हा पैसे मागितले. व्यावसायिकाकडून साडेसतरा लाख रुपये उकळण्यात आले. अखेर व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर ॲड. भाटे याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.