- April 24, 2023
- No Comment
एमपीएससी उमेदवारांचा डेटा लीक? एमपीएससीने केला खुलासा
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने उमेदवारांचा डेटा लीक झाल्याचा, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात येत आहे.
मात्र एमपीएससीकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा खोटा असून, बाह्यलिकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे समाजमाध्यमात प्रसिद्ध होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली असून, बाह्यलिंकची सुविधा बंद करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
एमपीएससीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर, तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी बाह्यलिकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे समाजमाध्यमात प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे बाह्यलिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले.
आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करून घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. प्रवेशप्रमाणपत्र लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असेही एमपीएससीने नमूद केले.