- June 29, 2023
- No Comment
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिघांना शस्त्रासह अटक
रावेत: पुनावळे येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचून त्यासाठी पिस्तुल आणल्या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
किशोर बापू भोसले (वय 31, रा. पुनावळे), अमित दत्तात्रय पाटुळे वय (वय 23, रा. शिंदेवस्ती चौक, रावेत), अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय 34, रा. पुनावळे गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार आहेत.
त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लाऊन किशोर भोसले आणि अमित पाटूळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे (राउंड) जप्त करण्यात आली.
त्यांनी पिस्तुल संशयित आरोपी गोरगले याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यानुसार संशयीत आरोपी गौरगले याला पोलिसांनी अटक केली.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सहायक निरीक्षक उद्धव खाडे यांनी गोरगले याच्याकडे तपास केला असता राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्याशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली त्याने दिली. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक केलेले आरोपी हे पोलीस रेकोर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्ध हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.