- December 17, 2024
- No Comment
अॅटोमोबाईल दुकानदारावर गुन्हा दाखल, अशोक लेलंड कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट बनवून विक्री
हडपसर: अशोक लेलंड या कंपनीचे स्पेअरपार्ट सारखेच बनावट स्पेअरपार्ट बनवून त्याची अशोक लेलंड नावाने विक्री करुन कॉपीराईट कायद्याचा भंग केला जात असल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी रेवणनाथ विष्णु केकाण (वय ४२, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार घोरपडे पेठेतील दीपक अॅटोमोबाईल या दुकानात रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडला
त्यावरुन पोलिसांनी दीपक उत्तमचंद चोरडिया (वय ५६, रा. ब्रम्हा मेजेस्टीक, एनआयबीएम रोड, कोंढवा) याच्या कॉपीराईटनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीकडे अशोक लेलंड कंपनीचे स्वामीत्व हक्क आहेत. अशोक लेलंडच्या नावाने बनावट स्पेअर पार्टची विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दीपक अॅटोमोबाईल या दुकानावर छापा घातला. त्यात अशोक लेलंड कंपनीच्या मुळ स्पेअरपार्टवर असलेले छपाई, होलोग्राम, एमआरपी स्टिकर इत्यादी हुबेहुब दिसणारे ३६ हजार ३२९ रुपयांचे ५ नग दुकानात विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले. अशोक लेलंडचे मुळ स्पेअरपार्ट असल्याचे भासवून विक्री करुन कॉपीराईट कायद्याचा भंग केला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे स्पेअरपार्ट जप्त केले असून पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.