- December 24, 2024
- No Comment
नाताळनिमित्त पुणे शहरातील ‘या’ भागात वाहतुकीत बदल
पुणे: ख्रिसमस सणाच्या निमित्ताने पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कॅम्प परिसरातील वाहतुकीत काही बदल केले आहेत.
तसे आदेश पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.
लष्कर वाहतूक विभागातील वाहतुकीतील हे बदल 24 डिसेंबर आणि २५ डिसेंबर सायंकाळी ७ पासून ते गर्दी संपेपर्यंत लागू असणार आहे.
असे असतील वाहतूकीतील बदल:
१) वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद केली जाईल आणि ती कुरेशी मशिद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविली जाईल.
२) इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करून ही वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तिनतोफा चौक सरळ लष्कर पोलिस स्टेशन अशी वळविण्यात येणार आहे.
३) व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
४) इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळवण्यात येईल.
५) सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येईल.