- January 15, 2025
- No Comment
लांछनास्पद! पुण्यात वडिलांचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; बिबवेवाडीतील घटना
पुणे: हिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असून त्या घरातही सुरक्षित नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच एक घटना बिबवेवाडीमध्ये घडली असून वडिलांनी स्वत:च्या १९ वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला.
ही घटना ११ जानेवारी रोजी घडली. पोटच्या मुलीच्या अंगावर हात टाकताना या नराधमाचे हात कचरले नाहीत. तिचे कपडे पूर्णपणे फाडून तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असताना घरामध्ये आलेल्या लहान बहिणीच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आणि या मुलीची सुटका झाली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात १९ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिल्यावर तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी वडील वाशिम जिल्ह्यात त्याच्या गावी राहण्यास आहे. पीडित मुलगी तिची आई, चार बहिणी आणि एका भावासह बिबवेवाडीत राहण्यास आहे. पिडीत मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेते. तिचा वडील आठ दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्याकडे आलेला होता. पिडीत मुलीची आई घरकाम करते.
पीडित मुलगी घटनेच्या दिवशी सकाळी घरात काम करत होती. तिची आई कामावर तर, लहान बहीण कॉलेजला गेली होती. उर्वरित दोन लहान बहिणी मामाकडे गेल्या होत्या. दिवसभर ती एकटीच घरामध्ये होती. संध्याकाळी साधारण चार वाजण्याच्या सुमारास तिचे वडील घरी आले. त्यावेळी मुलगी जेवण करीत होती. आरोपी वडिलांनी तिला जेवण वाढण्यास सांगितले. मुलीने जेवण वाढल्यावर अचानक त्यांनी बडबड सुरु केली. तसेच, तिला शिवीगाळ केली. त्यावेळी या मुलीने वडिलांना ”शिवीगाळ करू नका, जेवण करा” असे म्हटले. त्यावेळी आरोपी वडिलांना राग आला. तो तिच्या अंगावर धावून गेला. तिला हाताने मारहाण सुरू केली. त्यानंतर तिला घरातील खाटेवर जोरात ढकळून दिले. तिच्या अंगावरील टॉप आणि पॅंट फाडली. तसेच, तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यावेळी पीडित मुलीने वडीलाला लाथ मारली. तसेच, त्याच्या तावडीमधून सुटका करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. नेमकी त्याच वेळी तिची लहान बहीण घरात आली. तेव्हा आरोपीने या दोघींना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ सुरू असतानाच त्यांची आईदेखील घरी आली. तिने हा सर्व प्रसंग पाहून आरडाओरडा करीत या दोघींची नराधमाच्या हातून सुटका केली. कशाबशा या दोघी घराबाहेर आल्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही; तर त्याने या मुलींना घराबाहेर येऊन बेदम मारहाण केली. जमा झालेल्या आसपासच्या लोकांनी या दोघींना सोडवले. त्यानंतर, पीडित मुलीला घेऊन तिची आई पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.