- January 17, 2025
- No Comment
अखेर वाल्मिक कराडने केला मालमत्ता कराचा भरणा

पिंपरी: सरपंच हत्त्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मानला जाणारा वाल्मिक कराड याने वाकड येथील त्याच्या सदनिकेचा मालमत्ता कर जमा केला नव्हता. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने जप्तीची नोटीस बजावल्यानंतर बुधवारी (दि.१५) सायंकाळी कराडने आपल्या दोन्ही सदनिकांचा थकीत आणि चालू मालमत्ता कर जमा केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असणारा वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली कराड यांच्या नावे वाकड येथील दोन वेगवेगल्या उच्चभ्रू गृह प्रकल्पांमध्ये दोन सदनिका आहेत. वाकड येथील पार्क स्ट्रीट गृह प्रकल्पातील पार्क आयवरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एच ६०१ क्रमांकाची सदनिका आहे. तर, दुसरी सदनिका क्रमांक ४०३ ही मि कासा बेला बी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांनी एच ६०१ या सदनिकेचा एकूण एक लाख ५५ हजार ४४३ एवढा मालमत्ता कर २०२१ पासून थकीत ठेवला. तर, ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटचा एकूण ९ हजार ६८७ एवढा चालू मलमत्ता कर जमा केलाच नाही.
वाल्मिक कराड यांचा मालमत्ता कर थकीत होता. वेळेत कर जमा करण्याची नोटीस त्यांना वेळोवेळी देण्यात आली. प्रतिसाद येत नसल्यामुळे प्रशासकीय कार्यवाहीनुसार जप्तीची नोटीस काढण्यात आली. त्यावर बुधवारी (दि. १५) सायंकाळी त्यानी दोन्ही सदनिकांचा थकीत आणि चालू मालमत्ता कर पालिकेकडे जमा केला आहे.
– अविनाश शिंदे,
सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग
सरपंच खून प्रकरणामुळे वाल्मिक कराड याच्या मालमत्ता क्रमाक्रमाने समोर येऊ लागल्या. त्यापैकी पिंपरी-चिंचवड शहरातील या दोन मालमत्ता समोर आल्याने प्रसार माध्यमांनी त्याची चांगलीच दखल घेतली. या सदनिकांची २०२१ मध्ये महापालिकेकडे नोंद केल्यापासून आजपर्यंतचा मालमत्ता कर जमा केलेला नाही.
त्यामुळे पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी मालमत्ता सील करण्याची नोटीस दिली होती. विरोधात बातम्या आल्यानंतर कराड याने बुधवारी सायंकाळी एच ६०१ या सदनिकेचा १ लाख ५५ हजार ४४३ आणि आणि ४०३ या सदनिकेचा एकूण ९ हजार ६८७ एवढा मालमत्ता कर पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे ऑनलाईन जमा केला.




