- January 22, 2025
- No Comment
स्वारगेट बस स्टँड, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारा टोळका गजाआड

स्वारगेट: स्वारगेट बस स्टँड तसेच पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडे तीन मोबाईल सापडले आहे. तसेच चोरट्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीचे मोबाईल खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून ४३ मोबाईल तसेच एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
सतिश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२ वर्षे, रा. फिरस्ता, पुणे स्टेशन व स्वारगेट बस स्टँड परिसर, मुळ गाव – मु. पो. दहीटणे, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपी सतिश शिरोळे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर चोरीचे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टॉप येथे अधूनमधून चोरीच्या घटना घडतात. त्या अनुषंगाने स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी परिसरात सकाळी गर्दीच्या वेळी गस्त घालण्यासाठी तसेच गुन्हे प्रतिबंधक कारवाईसाठी पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या. नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे तसेच पोलीस शिपाई सुजय पवार, दिपक खेंदाड, फिरोज शेख, हनुमंत दुधे यांच्या पथकाने त्यानुसार गस्त घालण्यास सुरुवात केली होती.
२२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वारगेट पी.एम.पी.एम.एल. बस स्टॉप येथे गस्त घालत असताना एक संशयास्पद व्यक्ती आढळला. ती व्यक्ती प्रवाशांच्या गर्दीत संशयास्पद रितीने वारंवार फिरत होती. त्याच्या हालचालींवरून संशय बळावल्याने, पथकाने त्याला हटकले. त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची ओळख विचारली. त्याने आपले नाव सतिश ज्ञानेश्वर शिरोळे असल्याचे सांगितले.
त्याला ओळखपत्र विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच त्यावेळी त्याच्याजवळ तीन मोबाईल फोन सापडले. यामध्ये एक विवो कंपनीचा, एक रेडमी कंपनीचा आणि एक ओपो कंपनीचा मोबाईल होता. अधिक चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात आणले. अधिक विचारपूस केल्यावर मागील महिन्यात स्वारगेट पीएमटी बस स्टॉप येथे सकाळच्या वेळी एका महिलेचा विवो कंपनीचा मोबाईल चोरल्याचे त्याने कबूल केले. तसेच, पुणे स्टेशन परिसरात रेडमी आणि ओपो कंपनीचे दोन मोबाईल चोरी केले असल्याचे त्याने सांगितले. आकाशी रंगाच्या व्ही २७ मॉडेल असलेल्या विवो कंपनीच्या मोबाईलसंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे समोर आले.
तपासात आरोपीने खुलासा केला की, पुणे स्टेशन व स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरात चोरी केलेले मोबाईल फोन त्याच्या ओळखीच्या मोबाईल दुकानदार मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी (वय ३४ वर्षे, अशरफनगर, कोंढवा, पुणे ) याला विकले होते. पोलिसांनी अन्सारी याच्याकडून ७ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे ४३ मोबाईल फोन आणि सॉफ्टवेअर मारणारे एक लॅपटॉप जप्त केले. पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अश्रुबा मोराळे करत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, पोलीस अंमलदार सुजय पवार, दिपक खंदाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, संदीप घुले यांनी केली.




