- February 5, 2025
- No Comment
पुण्यात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड सुरूच, पुन्हा ६० ते ७० गाड्या फोडल्या

पुणे: पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड सुरू आहे. परिसरात उभ्या असणाऱ्या महागड्या वाहनांची तोडफोड केली जात आहे.
पुण्यातील येरवडा, बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बिबवेवाडीमध्ये पुन्हा ६० ते ७० वाहनांची तोडफोड करण्यात आली. हातामध्ये कोयता घेऊन टोळक्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. रिक्षा, चार चाकी, दुचाकी अशा ६० ते ७० गाड्या फोडण्यात आल्या आहेत. हातात कोयते घेऊन मध्यरात्री ३ वाजता ३ तरुणांनी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती नागरिकांनी दिली. पोलिस सकाळी या तरुणांना अटक करतात संध्याकाळी सोडून देतात, असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
बिबवेवाडीमध्ये घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत टोळक्यांनी तोडफोड केली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३ जणांची ओळख पटवली असून ते या तरुणांचा शोध घेत आहेत. वाहन तोडफोडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
येरवडा: पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ३ जणांना अटक केली. येरवडा परिसरातूनच अवघ्या सहा तासांत आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर अशी आरोपींची नावं आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.




