- September 15, 2022
- No Comment
इंटरनेट केबल चालकाला हप्ता मागत हात-पाय तोडण्याची धमकी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुळशी: मुळशी येथे आय.टी.पार्क परिसरात एअरटेल कंपनीचे इंटरनेट पुरवणाऱ्या केबल चालकाला महिन्याला ठराविक हप्ता देण्याची मागणी करत हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना मुळशी येथील आय.टी.पार्क येथे घडली आहे.
या प्रकरणी रोहीत संजय शिवले (वय 36 रा.सोमवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश ओझरकर (रा.माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचे एअरटेल कंपनीचे इंटरनेट केबल पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्याच केबलचे दुरुस्तीचे काम कंपनीचे सप्लायर करण शिंदे हे करत असताना आरोपी तेथे आला व त्याने शिंदे व इतर कामगारांना काम करण्यास मनाई केली. तसेच महिन्याला वीस हजार रुपये हप्ता दे, नाही तर तुझे केबल तर तोडीनच पण तुझे हातपाय पण तोडीन, पुन्हा आलास तर मुळशी पॅटर्न करीन असे म्हणत खंडणीची मागणी केली.यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.