- September 18, 2022
- No Comment
आळंदीकरांसाठी महानगरपालिकेचा मोठा निर्णय
आळंदी: आळंदी नगरपरिषदेने पाणीपट्टी व पंपिंगची 25 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी न भरल्यास 1 ऑक्टोबरपासून आळंदीचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे. याबाबतचे पत्र महापालिकेने आळंदी नगरपरिषदेला पाठविले आहे.
सदर माहिती आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली असून पुढे ते म्हणाले, कि अधीक्षक अभियंता भामा, आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे महानगरपालिका यांच्या नावे 19 जुलै 2022 रोजी आळंदी नगरपरिषदेने पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड जलवाहिनीतून कुरुळी टॅपिंगद्वारे करण्यात आलेल्या पाणी आकारणी बिलाबाबत पत्र लिहिले होते.
भामा आसखेड हा 200 एमएलडीचा प्लांट आहे. पंप हाऊसही भामा आसखेड येथे आहे. 200 एमएलडीला महापालिकेच्या दराने आकारणी होत आहे. महापालिकेकडून पंप हाऊस देखभाल (वॉचमन,लेबर इ.), वीज बिल, पाटबंधारे खाते पाण्याचे बिल या तीन बिलाची आकारणी होते. त्या 200 एमएलडीच्या प्रमाणात 10 एमएलडीचे ते नगरपालिकेला बिल देत आहेत.
आळंदी ते कुरुळी लाईनही पूर्णपणे गुरुत्वावर (कुरुळी येथून आळंदीला विना पंपद्वारे पाणीपुरवठा) होत आहे. 10 एमएलडीवर ते पंप हाऊस देखभाल (वॉचमन,लेबर इ.), वीज बिल, पाटबंधारे खाते पाण्याचे बिल लावण्यात येत आहेत. या बिलांसंदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी महापालिकेबरोबर लवकरच बैठक घेणार आहे. याबाबत सर्व माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शिरगिरे यांनी दिली. 200 एमएलडीमधून 10 एमएलडी पाणीपुरवठा हा आळंदीला होत आहे.
महापालिकेने आळंदी नगरपरिषदेला 17 फेब्रुवारी ते 31 मार्च या दिवसाचे 6 लाख 2 हजार 581 रुपये, 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 पर्यंतचे 19 लाख 51 हजार 117 रुपये अशी दोन बिले पाठविली आहेत. अशी एकूण 25 लाख 53 हजार रुपये थकबाकी आहे.