- September 18, 2022
- No Comment
पुणे:सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार महाविद्यालयांच्या परीक्षा
पुणे: राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या परीक्षा संपवल्या. परंतु केंब्रिज समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डुगडुग गाडीकडून सप्टेंबरअखेरपर्यंत वरीष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा चालणार आहेत.
त्यानंतर ‘निकाल लावला’ जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्गाचे प्रवेश दिवाळीनंतर सुरू होतील आणि पुढील वर्षाचेही वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत. यानिमित्ताने ‘बोर्डाला जमते ते विद्यापीठाला का नाही’ असा सवाल चर्चेत आला आहे.
राज्य बोर्डाने कंबर कसली आणि दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेत घेतल्या आणि निकालही वेळेत लावला. पुणे विद्यापीठाचे वरीष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. एरवी मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा सुरू व्हायच्या. पण ऑफलाइन की ऑनलाइन या कचाट्यात पहिल्या सत्रास फेब्रुवारी उजाडले. आता दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जुलैअखेर सुरू आहेत. वाणिज्य व विज्ञान विभागाच्या परीक्षा उरकल्या आहेत पण कला शाखेच्या १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. विज्ञान-वाणिज्यचा निकाल लवकर लागेलही पण कला शाखेला अक्षम्य विलंब होऊ शकतो. २४ ऑक्टोबरला दिवाळी आहे.
त्यामुळे दिवाळीनंतरच पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि नवे वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, अशी शक्यता आहे. परीणामी पुढील शैक्षणिक वर्षाचेही वेळापत्रक कोलमडणार आहे. या गोंधळात जूनपासून शिक्षक महाविद्यालयात येत आहेत पण अध्यापन नव्हे तर परीक्षांचेच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
व्दितीय वर्ष कला शाखेकडुन, २५ जुलैला परीक्षा चालू झाली ती २९ सप्टेंबरला संपणार. परीक्षा अडीच महिने चालल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आला नाही. २०२३ ची स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. पण स्पर्धा परीक्षेचा निकाल येईल तेव्हा माझा तिसऱ्या वर्षाचा निकाल येईलच याची शाश्वती नाही.
महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले, की अन्य विद्यापीठांपेक्षा परीक्षा चांगल्या पध्दतीने होत आहेत. मुलांना लिहायची सवय नसल्याने वेळ वाढवला आणि पेपरमध्ये अंतरही ठेवले आहे. महाविद्यालयाकडेच पेपर तपासणी, मार्क एंट्री होणार असल्याने पहिल्या दोन वर्षांचे निकाल लवकर लागतील. तिसऱ्या वर्षाचे पेपर विद्यापीठ पातळीवर असले तरी जलदगतीने निकाल लावण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
काही विद्यापीठांचे प्रवेशही सुरू झाले. इथे परीक्षाच चालल्यात. कोरोनानंतर फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षेत दीड महिना घालवण्याऐवजी मुलांना शिकवूद्या आणि पहिले व दुसरे सत्र एकत्र घ्या अशी मागणी केली होती.