- September 26, 2022
- No Comment
चिंचवड: दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी फरार
चिंचवड: चिंचवड दवा बाजार येथे तरुणाचा रात्री दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहदेव उर्फ सद्या सरवदे (रा. आनंदनगर, चिंचवड) व अनोळखी इसम असा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत सागर निल्लप्पा कांबळे याचा भाऊ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपीला अटक केली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा खून झाल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. पोलिसांनी सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघेजण सागर सोबत दिसत आहेत.
मागील आठवड्यात सागरने एका मुलीची छेड काढली होती. त्यावरून त्याला मारहाण झाली होती. त्याला दारूचेही व्यसन होते. रात्री तिघेजण कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांचा वाद झाला. दोघांनी सुरुवातीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाळ्यांच्या समोर मारहाण केली. तिथे सागरचा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर आरोपींनी सागरला जखमी अवस्थेत सोसायटी समोरील अंगणात भिंतीजवळ आणले आणि दगडाने त्याचे डोके ठेचले. यात सागरचा मृत्यू झाला. पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आली आहे.
निगडी पोलीस तपास करीत आहेत.