- September 27, 2022
- No Comment
दरोडा टाकण्यासाठी बँकेत आलेल्या टोळीला पिस्तुलासह केले जेरबंद, महिला पोलिस अमलदाराची कामगिरी
निगडी: निगडी पोलीस ठाण्याच्या धाडसी महिला पोलिस अमलदाराने दरोडा टाकण्यासाठी बँकेत आलेल्या टोळीला पिस्तुलासह जेरबंद केले. निगडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिसांना सरस्वती काळे यांनी केलेल्या या धाडसी कामगिरीसाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी त्यांना 10,000 रुपये बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
प्रमोद चांदने (रा. नेवाळेवस्ती, चिखली) व जयदीप चव्हाण व संतोष चोथवे (दोघेही राहणार मोरेवस्ती, चिखली) यांना या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 393, होर्नेट 3(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 137(1)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी आकुर्डी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम (एच.पी) पेट्रोल पंपाचे कर्मचारी अमोल राजाभाऊ चौधरी त्यांच्याकडील दोन दिवसाचे जमा झालेले पेट्रोल पंपावरील कलेक्शन 12 लाख रुपये बँकेमध्ये भरणा करण्याकरिता दुपारी आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी आले होते. त्यावेळेस बँकेच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांनी त्यास नागरिकांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झेडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल व चार जीवंत राऊंड मिळाले.
या घटनेची माहिती निगडी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रमोद चांदने असे सांगितले. तसेच त्याच्यासोबत आणखी त्याचे दोन साथीदार जयदीप चव्हाण व संतोष चोथवे तिघे मिळून आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी दरोडाच्या उद्देशाने घातक हत्यार आणले असल्याची कबुली दिली. त्यामुळे तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस ठाणे करीत आहे.